पांडुरंग भिलारे -- वाईसंपूर्ण राज्यात दुष्काळाची दाहकता व भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरातही पाण्याचे स्त्रोत आटले असून, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे़ उन्हाची तीव्रता वाढल्याने मर्यादित राहिलेले जलस्त्रोत ही संपण्याच्या मार्गावर आहेत़ या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून विविध ठिकाणी पर्यावरणप्रेमी पक्ष्यांना तसेच झांडाना आपापल्या परीने पाणी देण्याचे काम नोकरदार, व्यावसायिक , पर्यावरणप्रेमी करताना दिसत आहेत़ वाई-पसरणी घाटात, सोनजाईच्या डोंगरात, मांढरदेवीच्या घाटात या परिसरात अनेक लागवड केलेल्या रोपट्यांना पाणी घालण्याचे काम करीत आहेत़ तसेच विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी वॉटर बँक केल्याच्या दिसत आहेत़ यामुळे ऐन उन्हाच्या तीव्रतेतही झाडांना तसेच पक्ष्यांना दिलासा मिळाला आहे़ पसरणी घाटात वाईहून पाचगणीला नोकरीच्या निमित्ताने जाणारे कर्मचारीही येताना पाण्याचे कॅन भरून आणून अर्ध्या घाटात बसमधून उतरून झांडाना पाणी घालत आहेत. तसेच एसटी बसचे कर्मचारीही सहकार्य करताना दिसत आहेत़ अनेक झांडाना प्लास्टिकचे कॅन अडकवून त्याला सलाईनद्वारे पाणी दिल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत़माणसांना तसेच पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. जमिनीत कोणत्याही प्रकारचा ओलावा राहिलेला नाही़ यामुळे शिवारात तसेच डोंगरात, माळावर वर असणाऱ्या लहान-लहान रोपट्यांनाही जिवंत राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे़ त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, शेतकरी तसेच विघ्नसंतोषी लोकांमुळे खासगी शेतीच्या व पडीक रानात तसेच वनविभागाच्या डोंगरात वणवा लावणाऱ्यांची मुजोरी वाढत चालली आहे. दोषींना कोठेही दंड अथवा कडक शासन होताना दिसत नसल्याने पर्यावरणप्रेमी हतबल असून, त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे़
निराधार रोपट्यांना माणुसकीचा ओलावा
By admin | Updated: April 6, 2016 00:05 IST