वाई : तालुक्यातील कुसगाव येथील वरी देवीचा कडा नावाच्या डोंगरात सागवान झाडाच्या बुंध्यात एक मानवी सांगाडा आढळला असून, अजून एक मृतदेह कृष्णा नदीपात्रात बावधन हद्दीत आढळला. यातील बावधन येथील मृतदेहाची ओळख पटली आहे. या घटनेमुळे तालुक्यात घबराट पसरली आहे.वाई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुसगाव येथील रमेश आत्माराम वरे हे धर्माजी रामचंद्र वरे यांच्या देवीचा कडा या डोंगरात काल, शनिवारी जनावरे चरण्यास घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास झाडीत सागवानाच्या झाडाच्या बुंध्यात सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा दिसला. रमेश वरे यांनी घरी आल्यानतंर रात्री आठ वाजता पोलीस पाटील मोहन पाटणे यांना याची माहिती दिली. त्यानुसार पाटणे यांनी वाई पोलीस ठाण्यात माहिती दिली. हा सांगाडा सडलेल्या अवस्थेत असल्याने तो पुरुष किंवा स्त्री जातीचा आहे, किंवा मृत व्यक्ती किती वयाची असावी, हे समजू शकले नाही. पोलीस हवालदार सी़ आऱ पाटील तपास करीत आहेत़बावधन गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात मासेमारीसाठी आलेल्या माणसांना रविवारी एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती वाई पोलिसांना दिली. यासंदर्भात पोलीस तपास केला असता हा मृतदेह प्रशांत ससाणे (वय २९, रा. रविवार पेठ, वाई) यांचा असल्याची खात्री झाली़ प्रशांत मुकुंद ससाणे हे बुधवार (दि़ ६) पासून बेपत्ता असल्याची फिर्याद प्रशांत ससाणे यांच्या भावाने दिली होती. दरम्यान, प्रशांत ससाणे हा आईशी भांडणे झाल्यानंतर घरातून निघून गेला होता. पोलीस हवालदार मोहन क्षीरसागर तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)कुसगाव हद्दीत आढळलेला सांगाडा सडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ओळख पटविणे पोलिसांना अवघड जात आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ मोबाईल सीमकार्ड, बॅटरी, तसेच काचेचे मनगटी कडे, तसेच जीन्स पॅन्ट आढळली. त्यामुळे सापडलेले सीमकार्ड हे एकमेव धागा असून, त्याद्वारे पोलीस तपास करीत आहेत.
झाडाच्या बुंध्यात मानवी सांगाडा !
By admin | Updated: August 11, 2014 00:16 IST