संजय पाटील --कऱ्हाड पाऊस कधी पडेल, याचा अंदाज वर्तविता येतो; पण किती पडेल हे निश्चित सांगणं कठीण. प्रत्येक तालुक्याचा महसूल विभाग चोवीस तासात पडलेला पाऊस मोजतो. त्याची मंडलनिहाय आकडेवारीही जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवतो. मात्र, या आकडेवारीवरही विश्वास ठेवणं सध्या मुश्कील होतय. पर्जन्यमापक यंत्रच खोटं बोलत असल्याने मंडलनिहाय पडलेला पाऊस खरा मानायचा का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, याची माहिती असणे आवश्यक असते. हेच गृहीत धरून ठिकठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहेत. ही यंत्र बसविताना मंडलनिहाय जागेची निश्चिती करण्यात येते. मंडलाच्या गावात पर्जन्यमापक बसविल्यानंतर दररोज या यंत्राद्वारे पावसाची नोंद घेतली जाते. हे काम त्या मंडलातील तलाठ्यांकडे असते. पर्जन्यमापक बसविण्यासाठी अनेक नियम आहेत. या निकषानुसार यंत्र बसविल्यास पावसाची अचूक नोंद घेता येणे शक्य असते. मात्र, सध्या निकषाकडे दुर्लक्ष करून यंत्र बसविण्यात आल्याने पावसाची नोंद अचूक असते का, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणची यंत्र उंच जागेवर बसविण्यात आलेली नाहीत. तसेच यंत्राच्या परिसरात मोठ्या इमारती किंवा विस्तीर्ण वृक्ष आढळतात. परिणामी, पाऊस अडण्याची व चुकीची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नोंद घेण्यासाठी महसूल कर्मचारी दररोज त्या यंत्राची पाहणी करतात. मात्र, पावसाळा संपल्यानंतर सात ते आठ महिने त्या यंत्राकडे पाहिलेही जात नाही. त्याची देखभाल, दुरुस्तीही केली जात नाही. परिणामी, पावसाळ्यात नोंदविला जाणार पाऊस अचूक असेलच, हे निश्चित सांगणे कठीण आहे. खरिपाचे नियोजन पावसावर अवलंबून असते. पावसाची शक्यता गृहीत धरूनच शेतकरी पेरणी व टोकणीची कामे घेतात. तसेच चोवीस तासात पडलेल्या पावसावरच आपत्ती व्यवस्थापनाचे काम चालते. मात्र, पर्जन्यमापकाद्वारे मोजल्या जाणाऱ्या पावसाची नोंदच संशयाच्या भोवऱ्यात असल्याने व्यवस्थपन कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...अशा होतात नोंदीचोवीस तासामध्ये कोणत्या मंडलात किती पाऊस पडला, याचे दररोज सकाळी मोजमाप होते. पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या मंडलातील तलाठी त्या नोंदी घेण्याचे काम करतात. घेतलेली नोंद पुढे तहसील कार्यालयाला कळविली जाते. तहसील कार्यालयातून तालुक्यातील सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविल्या जातात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन नोंदींचा अभ्यास करून व्यवस्थापनाच्या दृष्टीने पावले उचलते. तलाठ्यांचा भरवसा दुसऱ्यावर!पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात जाऊन तेथील पावसाची नोंद घेण्याचे काम तलाठ्यांकडे असते. मात्र, काही ठिकाणी अशा नोंदी घेण्याचे काम दुसरेच करीत असल्याचे दिसते. तलाठी त्या गावाकडे फिरकतही नाहीत. कोणाला तरी सांगून त्या नोंदी तलाठी स्वत:कडे घेतात व पुढे तहसील कार्यालयाला कळवतात, असे दिसून येते. त्यामुळे नोंदीत चुका होण्याची दाट शक्यता आहे. पर्जन्यमापकाचे तीन प्रकारपाऊस मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला पर्जन्यमापक म्हटले जाते. साधा अथवा विनास्वयंचलित पर्जन्यमापक, स्वयंचलित पर्जन्यमापक व स्वयंचलित वेधशाळेतहज पर्जन्यमापक असे पर्जन्यमापकाचे तीन प्रकार आहेत.पर्जन्यमापक बसविण्याची पद्धतपर्जन्यमापक बसविण्यासाठी त्या भागातील किंवा गावातील भौगोलिकदृष्ट्या प्रातिनिधीक स्वरूपाची जागा निवडण्यात येते. पर्जन्यमापक ठिकाणाकडे जाण्यासाठी पावसाळ्यात अडचण येणार नाही आणि रस्ता असणारी जागा निवडली जाते.संबंधित जागेच्या चारही बाजूस सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत उंच इमारत, झाडे, डोंगर, टेकडी असणार नाही, याची दक्षता घेतली जाते.साधा किंवा विनास्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यासाठी तळाचा भाग काँक्रीटने भरून घ्यावा. त्यावर मध्यभागी उंच वीट आणि सिमेंटचे बांधकाम करावे. वरील पृष्ठभाग सपाट करून घ्यावा. त्यावर पर्जन्यमापकाचा सांगाडा मध्यभागी ठेवावा. पर्जन्यमापकाच्या सांगाड्याभोवती उंच विटांचे बांधकाम करावे. त्यावर ५ से. मी. काँक्रीटचे काम करावे आणि चारही बाजूला थोडासा उतार करावा.पर्जन्यमापकाचे नरसाळे आणि सांगाड्याचा जोड जमिनीपासून ३० सें. मी. उंच राहील याची काळजी घ्यावी. पर्जन्यमापकाचे मोजपात्र २०.० मि. मी. क्षमतेचे असते आणि प्रत्येक रेषा ही ०.२ मि. मी. वर असते.
पाऊस किती पडला; खरं सांगणार का?
By admin | Updated: June 11, 2016 00:51 IST