वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडीत सोमवार-मंगळवार दोन दिवस केलेल्या तपासणी अहवालात १७ ग्रामस्थ कोरोना बाधित आढळल्याने मागील पंधरा दिवसांपासून सापडलेल्या एकूण कोरोनाबाधित ग्रामस्थांची संख्या २४ च्या वर जाऊन पोहोचल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गावात कडक निर्बंध लागू केले आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली असून, वेळेचे निर्बंध न पाळणाऱ्या दुकानदारांना आणि मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच रंजना बनगर व ग्रामसेवक शिवयोगी वंजारी यांनी केले आहे. मागील महिन्यात बनगरवाडीतील एका दुकानदाराचा अहवाल बाधित आला होता. तर गावातील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी धुळदेव या ठिकाणी गेले होते. तर आठवड्यापूर्वी मुंबई-पुण्यावरून काही बाधित ग्रामस्थ येऊन, गुपचूप खासगी डॉक्टरांकडून घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर चार-पाच दिवसांनी गावातील अनेकांना अंगदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता तेराजण बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर सोमवार-मंगळवार दि. १९ व २० रोजी पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता, दोन दिवसांत १७ जण बाधित असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आल्याने घरीच त्यांना आयसोलेशन करून औषधोपचार सुरू केले आहेत. यामुळे बनगरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
२२ बनगरवाडी
बनगरवाडी (ता. माण) येथे वेळेचे निर्बंध न पाळणाऱ्या दुकानदारांंकडून दंड वसूल करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक शिवयोगी वंजारी, सरपंच रंजना बनगर,तलाठी गणेश म्हेत्रे व पोलीस पाटील शहाजी बनगर उपस्थित होते.