लोणंद : आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. चैतन्याच्या या उत्सवात यंदा गणेशभक्तांनी उत्साहासोबत सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचे आवाहन सातत्याने शासनाकडून केले जात आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनारूपी विघ्न कायमचे दूर होईल, असा सकारात्मक भाव गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
बाप्पाच्या आगमनासाठी, साहित्य खरेदीसाठी तानाजी चौकात व कुंभारवाड्यात तसेच लक्ष्मी रोडवर गर्दी दिसून आली. जणू शहरात कोरोनाचा संसर्ग नाहीच, याच आविर्भावात लोणंदकरांनी दिलखुलास खरेदीला झुकते माप दिले. मिठाई, फळे, फुलांपासून, पूजेचे साहित्य, कपड्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. चैतन्य घेऊन येणाऱ्या या बुद्धीच्या आणि कलेच्या देवतेचे स्वागत करण्यात लोणंद व परिसरातील नागरिक दिवसभर दिसून आले.
मोठ्या भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शेकडो नागरिकांनी कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घेऊन आपल्या घरी विराजमान केल्या. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत लक्ष्मी रोड व तानाजी चौक परिसरात गणेशभक्तांनी गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. या परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीस बंदी असल्याने पारंपरिक वाद्यांच्या साह्याने गणेशमंडळांनी साध्या पद्धतीने गणेशमूर्ती घेऊन गावागावात बाप्पांचे भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.