खटाव : गॅसच्या दरात झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पुन्हा एकदा मातीच्या चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडरला सध्यातरी विश्रांती देत शोभेची वस्तू बनवली आहे.
ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबातील महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्त करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी गाजावाजा करत केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत घराघरांत मोफत गॅस कनेक्शन दिले. सुरुवातीला दर कमी असल्यामुळे सारे काही सुरळीत चालले होते; परंतु सध्या सुरू असलेल्या गॅस दर वाढीमुळे व गॅस दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासोबतच नोकरदार, व्यावसायिकांचेही आर्थिक बजेट कोलमडले आहे. सुरुवातीला पाच, दहा रुपयांची वाढ झाली. तिथपर्यंत ठीक होते; परंतु नंतर ती पंधरा-वीस रुपयांपर्यंत आणि आता तर चक्क पन्नास रुपयांची दरवाढ करून सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे.
वाढणाऱ्या किमती आता तरी थांबतील असे वाटत असताना वाढत जाणाऱ्या किमतीमुळे जनता हैराण झाली आहे. सुरुवातीला चारशे रुपयांना मिळणारा सिलिंडर आठशेचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. सध्या त्याला नऊशे रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे महिन्याला एवढी रक्कम आणायची कोठून, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कुटुंबाचे मासिक उत्पन्न तुटपुंजे असलेली असंख्य कुटुंबे ग्रामीण भागात आहेत.
आर्थिक जनगणनेच्या आधारावर कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांबरोबर महिलांनाही गॅस दरवाढीमुळे घरखर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोट
गॅसमुळे वेळची बचत होते म्हणून जुन्या वस्तूकडे पाठ फिरवली होती; परंतु आता परत घरखर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. पैशाची बचत करताना पारंपरिक चुलीचा वापर करने योग्य आहे असे वाटत आहे.
- अनिता कुंभार, गृहिणी खटाव
कॅप्शन : ०७खटाव-गॅस
खटाव तालुक्यातील अनेक महिलांनी गॅसदरवाढीला कंटाळून पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे. (छाया : नम्रता भोसले)