कऱ्हाड : तासवडे, ता. कऱ्हाड येथील टोलनाक्यानजीक उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून महामार्गावर पडली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांसह टोलनाका कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी पोहोचून तार हटविली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारा तुटून महामार्गावर पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. शनिवारीही तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर सातारा-कोल्हापूर लेनवर उच्च दाबाची वीजतार तुटून पडली. महामार्गावरच तार तुटून पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर बाजूस जाणारी वाहने थांबली. संबंधित तारेमधून वीजपुरवठा सुरू असण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांसह टोलनाका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्यांनी ही घटना तातडीने तासवडे-एमआयडीसीमधील वीज कार्यालयाला कळविली. त्यानंतर वीजपुरवठा खंडित करून कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी महामार्गावरून तार हटविली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली. टोलनाका कर्मचाऱ्यांसह वीज कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने महामार्गावरील तार हटविल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच टोलनाक्यानजीक वाहने थांबत असल्याने व त्याचठिकाणी ही तार पडल्यानेही दुर्घटना टळली. टोलनाक्याऐवजी इतर ठिकाणी अशी तार पडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
उच्च दाबाची वीजतार महामार्गावर कोसळली
By admin | Updated: May 17, 2015 01:25 IST