कुसूर : विंग, ता. कऱ्हाड येथे पिकांना आता रानडुकरांनी लक्ष केल आहे. विशेषत: येथील डोंगरपायथा परिसरात उभ्या पिकात कळपाकळपाने त्यांचा धुडगूस सुरू आहे. रातोरात पिके फस्त होऊ लागली आहेत. तोंडचा घास हिरावून नेल्यासारखी स्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे.
नियमांचे उल्लंघन
कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवरती विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. काही ठिकाणी दुकानांतील साहित्यही रस्त्यावर तसेच फुटपाथवर मांडण्यात आल्याचे दिसून येते.
रस्त्याचे डांबरीकरण (फोटो : १७इन्फोबॉक्स०२)
कोपर्डे हवेली : विभागात ठिकठीकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत. यंदा परतीचा पाऊस लांबला. अवकाळी पावसानेही वेळोवेळी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्याच्या कामांना उशिरा सुरुवात झाली. सध्या बांधकाम विभागाने विभागातील दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कामांना प्रारंभ केला आहे.
बिबट्याची दहशत
कऱ्हाड : वसंतगड, ता कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. मात्र, या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.