बामणोली : कोरोना काळात अनेक शाळांची वीजबिले थकली आहेत. या बिलांची रक्कम खूप मोठी असल्याने एवढे पैसे कोठून आणायचे, अशी चिंता मुख्याध्यापकांना सतावत आहे. तेटली (ता. जावळी) प्राथमिक शाळा याला मात्र अपवाद ठरली आहे. या गावातील मुंबईकर ग्रामस्थ व तरुण ग्रामस्थांनी एकत्र येत देणगी गोळा करुन शाळेचे थकीत वीजबिल भरले. ग्रामस्थ विजय भोसले यांनी शाळेला प्रोजेक्टर भेट दिला.
प्रताप भोसले, विठ्ठल भोसले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शाळेला अन्य शैक्षणिक साहित्य भेट दिले. प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या साहित्याची आवश्यकता होती, असे मुख्याध्यापक महेश पडलवार यांनी सांगितले. यावेळी भरत भोसले, बबन भोसले, पांडुरंग भोसले, प्रकाश भोसले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.