सातारा : जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सलग तीन दिवस पावसाने झोडपून काढले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शनिवारी पहाटेपर्यंत पाऊस पडत होता. मात्र शनिवारी सकाळनंतर पावसाचा जोर मंदावला. सूर्यनारायणांचे दर्शन अधूनमधून घडत होते. त्यामुळे जिल्ह्यात शनिवार, रविवारी कडक निर्बंध लागू असतानाही शहरात गर्दी झालेली पाहायला मिळत होती.
साताऱ्यासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी पावसाचा जोर मंदावला. यामुळे सकाळी आठच्या सुमारास काही काळ ऊन पडले होते. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दीडच्या सुमारास २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर अचानक मंदावला. तीन दिवसांच्या पावसाने झालेल्या नुकसानीतून सावरण्याचे काम शेतकरी करत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरापासून आज शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ३७ मिलीमीटर पाऊस झाला असून या हंगामात आतापर्यंत सरासरी २२७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा ४२.५, जावळी ७१.१ पाटण ५५, कऱ्हाड ३१.४, कोरेगाव २५.४, खटाव १९.४, माण ११.६, फलटण ११.८, खंडाळा ४६.६, वाई ४९.४, महाबळेश्वर ७३.४. कोयना धरणात आजअखेर ३२.७९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.