पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत शनिवारी झालेल्या मुसळधार उन्हाळी पूर्व मान्सून पावसामुळे नऊ इंचाने वाढ झाली. दोन वेळच्या मुसळधार पावसाने एक फूट पाणीसाठा वाढून सद्य:स्थितीला कास तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होऊन मागील आठवड्यात कास तलावात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करून सातारा शहराला अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या एक-दोन उन्हाळी पूर्व मान्सून पावसानेे जमिनीत ओलावा निर्माण होऊन गुरुवारी तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने तीन इंच व शनिवारी तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने नऊ इंच पाणी पातळी वाढून तलावाच्या पाणीपातळीत एका फुटाने वाढ होण्यास मदत झाली आहे.
तलावातील पाणीपातळी खालावल्याने ठिकठिकाणी तलावात जमीन उघडी पडल्याचे चित्र दिसत असताना मुसळधार वळवाच्या पावसाने गतवर्षीएवढाच शिल्लक पाणीसाठा झाला आहे. तलावाच्या पाणीपातळीत एका फुटाने वाढ झालेली बाब समाधानकारक असली तरी मान्सूनची अनिश्चितता पाहता मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईपर्यंत सातारकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असल्याचे मत कास तलावाचे पाटकरी जयराम किर्दत यांनी व्यक्त केले.
फोटो ०८कास
सातारा तालुक्यात गुरुवारी व शनिवारी झालेल्या पावसाने कास तलावात एक फूट पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे.
(छाया : सागर चव्हाण)