सातारा : खून, खंडणी, विनयभंग, मारामाऱ्या यासारखे गंभीर गुन्हे नावावर असलेला सराईत गुंड सुहास लक्ष्मण जानकर ऊर्फ बोचर (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास धारदार शस्त्राने गळा चिरून तसेच डोक्यात विटा घालून निर्घृण खून करण्यात आला. आपल्या विवाहित बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून अरविंद जगन्नाथ जाधव (२६, रा. मंगळवार पेठ, सातारा) या भावाने राहत्या घरापासून काही अंतरावरच हा खून केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार पेठेतील चिपळूणकर बागेसमोरील चाळीत बोचरचे कुटुंबीय वास्तव्यास आहे, तर त्याच्या घरापासून जवळच अरविंद जाधव हा राहतो. गेल्या काही वर्षांपासून बोचर हा अरविंदच्या बहिणीला त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी अरविंदची बहीण प्रसूतीसाठी घरी आली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बोचर हातात कोयता घेऊन अरविंदच्या घराजवळ आला. यावेळी घरामध्ये अरविंदची बहीण आणि आई होती. अरविंदचे राजवाड्यावर छोटेसे चहाचे हॉटेल आहे. त्याला त्याचे वडील मदत करतात. रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून हे दोघे घरी गेले. त्यावेळी बोचर त्यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारत होता. अरविंदने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातातील कोयता त्याने अरविंदच्या अंगावर उगारला. याचवेळी त्याने बोचरच्या डोक्यात वीट मारली. बोचर खाली पडला. पुन्हा उठून तो अरविंदवर वार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे अरविंदने पुन्हा त्याच्या डोक्यात आणखी एक वीट मारली आणि त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन त्याच्यावर सपासप वार केले. यामध्ये बोचरचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडला त्यावेळी घटनास्थळालगतच घरगुती कार्यक्रम सुरू होता. काही लोकांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अरविंद घटनास्थळावर कोयता टाकून पळून गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळापासून ते समर्थ मंदिरापर्यंत श्वानाने माग काढला. त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले. पोलिसांनी शिरवळमधून अरविंदला अटक केल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. घरांना कुलपे लावून लोक गायब ! मंगळवार पेठेतील चिपळूणकर बागेलगत असलेल्या पापाभाई पत्रेवाला चाळीत हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. ही घटना काही लोकांनी पाहिली आहे. मात्र, दहशतीमुळे कोणीही माहिती द्यायला तयार होत नव्हते. एवढेच नव्हे, तर काहीजण चक्क घरांना कुलपे लावून इतरत्र निघून गेले आहेत. तरीही मारेकऱ्याचे नाव निष्पन्न करून शाहूपुरी पोलिसांनी केवळ चोवीस तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
गुंड सुहास बोचरचा गळा चिरून खून !
By admin | Updated: April 24, 2016 00:18 IST