सणबूर : ऊन, पावसाने न्हाऊन निघालेली हिरवीकंद वनराई, कड्याकपारीतून धावणारे धबधबे, धुक्याचे आच्छादन बाजूला होताच दूरवर दिसणाऱ्या पर्वतरांगा असे विलोभनीय दृष्य सध्या पाटण तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे.श्रावणसरींचे आगमन झाल्यामुळे सध्या हौशी पर्यटकांचे चमू जागोजागी दिसत आहेत़ पाटणपासून पश्चिमेला सुमारे पन्नास किलोमीटर वर चिपळूण हे कोकणाशी संलग्न तालुक्याचे ठिकाण आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कुंभार्ली घाटातील धबधब्यांचे पाणी ओसरले होते़ त्यानंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे वनराई पुन्हा नव्या जोमाने फुलली़ घाटमाथ्यावर जाताना सुरुवातीला बोपोली गावाजवळ पहिला धबधबा दिसतो़ त्यापाठोपाठ ढाणकल व घाटमाथ्यादरम्यान वेगळाच आनंद मिळतो़ घाटातील वाहनांची वर्दळ कमी असल्याने पर्यटकांना या विलक्षण निसर्गरूपाचा मोह आकर्षित करतो़ पावसाची रिमझिम एकसारखी सुरू असते़ धुक्याचे मोठे ढग डोंगर वलयापसून घाटमाथ्यापर्यंत वाऱ्याच्या हेलकाव्यावर वेगवेगळ्या दिशेला धावतात़ काहीवेळा समोरील पाच फुटांवरील व्यक्ती दाट धुक्यामुळे दिसत नाही़ क्षणभरात धुके निघून जातात़ पावसाची सर कमी होते़ आकाश थोडेसे स्वच्छ होऊन सभोवतालचा बराचसा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो़ तो क्षण मन मोहीत करणारा व काव्यमय असतो़ वाऱ्याची एखादी झुळूक येते अन् पाठोपाठ उंच वाढलेले हिरवेगार गवत जमिनीशी एकरूप होते़ वारा गवताला झोपवून पुढे जात असतो़ तर मागे तेच गवत पुन्हा उभे राहत असते़ पाऊस उघडून वातावरण कोरडे होताच पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो़ विविध जातींंच्या पक्ष्यांचे थवे गवतातील भक्ष्य शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असताना दिसतात़ रस्त्याकडेला खोल दरी, सखल भागातील भाताची शेती, दरीच्या मध्यभागी ओढ्याचे पाणी, अनेक वळणे घेत खळखळणारी नदी निसर्गाच्या सौंदर्यात भर घालते़ निसर्गसौंदर्याचा आविष्कार अगदी तळापासून घाटमाथ्यापर्यंत पाहताना मन थक्क होते़ दरीत कोसळणारे धबधबे दूरवरूनही पर्यटकांना आकर्षित करतात़ हिरव्यागर्द झाडीतून अचानक कुठून तरी धबधबा सुरू झाल्याचे दिसते़ अशा वातावरणात एखादी श्रावण सर येते़ अंधार वाटतो. धुक्याचे ढग परिसर व्यापून घेतात़ काही क्षण आपल्यासमोरच क्षितीज टेकल्यासारखे दिसते़ श्रावण सर निघून जाते आणि दुपारच्या उन्हातही सूर्याची किरणे कोवळी भासतात़ सध्या घाटमाथ्यावरील अशा ठिकाणी पर्यटकांची झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळते. प्रत्येक पर्यटक घाटमाथ्यावर येताच निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आपले वाहन उभे करून काहीकाळ थांबतोच. (वार्ताहर)
हिरव्याकंद वनराईत धुक्याचे ढग !
By admin | Updated: August 11, 2014 00:15 IST