चाफळ : ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबांनी ३१ डिंसेंबरअखेर शौचालयाची बांधकामे पूर्ण न केल्यास संबंधित कुटुंबांना शासनस्तरावरील कोणतीही शासकीय सुविधा दिली जाणार नसल्याची माहिती येथील ग्रामसभेत देण्यात आली.येथे आयोजित ग्रामसभा उपसरपंच अंकुश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ, पोलीस पाटील दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. दीक्षित, सदस्य उमेश पवार, एल. एस. बाबर, किसनराव जाधव तसेच प्राथमिक शाळा, अंगणवाडी शाळा, वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी सतीश माने यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्या साळुंखे या महिलेस वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील यांनी स्वत:च्या कारमधून रुग्णालयात नेले. त्याठिकाणी साळुंखे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने धोका टळला. त्याबद्दल डॉ. विद्या पाटील यांच्या कौतुकाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ यांनी मांडला. त्यास सभेने मान्यता देत ठराव घेण्यात आला. रोजगार हमीच्या २०१६-१७ मधील ग्रामस्थांनी सुचविलेल्या कामांना सभेने मंजुरी दिली. यामध्ये ११ लाख ९० हजारांची कामे प्रस्तावित आहेत. सद्य:स्थितीत १८२ लोकांची जॉबकार्ड नोंदणी असून, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे माने यांनी सांगितले. कृषी विभागाचे जलमृदुसंधारण कामाअंतर्गत विहिरीचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम राबविण्याची माहीम सुरू असून, इच्छुकांनी आपली नावे ग्रामपंचायतीस सुचविणे गरजेचे आहे. या सभेत ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळअंतर्गत करावयाची कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव, बालमजूर व पुनर्वसन कायदा तसेच संग्राम कक्षामधून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चाफळमधील ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती तसेच फरशी पुलाला दोन्ही बाजूंनी तारेची संरक्षक अडथळा भिंंत बांधावी, अशी मागणी माजी सैनिक किसनराव जाधव यांनी यावेळी केली.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी ग्रामपंचायतीने होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी डॉ. विद्या पाटील यांनी केली. ग्रामपंचायत कर आकारणी व वसुलीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन माने यांनी केले. अंकुश जमदाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शौचालय नसल्यास शासकीय सुविधा बंद
By admin | Updated: October 13, 2015 00:18 IST