--------------------------------------
कराड :
नांदगाव (ता. कराड) येथे बुधवार (दि.३) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदगाव येथील दरा नावाच्या शिवारात अनिल जुजार हे शेळ्या चरावयास घेऊन गेले होते. दुपारी ४ च्या सुमारास जुजार यांच्यासमोरच बिबट्याने शेळीवर हल्ला चढविला. त्यात ती ठार झाली. तर, जाताना एक कोकरू तो घेऊन गेला. जुजार यांच्यासमोर घटना घडूनही ते काहीही करू शकले नाहीत.
दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला समजताच त्यांचे पथक नांदगावात घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या वतीने दक्षता म्हणून गावात स्पीकरवरून सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गत महिन्यातही अशाच प्रकारच्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची आज पुनरावृत्ती घडल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.