सातारा : ‘शहरातील सुधारित पाणी योजनेचे काम बारगळलेल्या स्थितीत आहे. २४ तास पाण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत,’ अशा भाषेत सातारा पालिकेच्या विशेष सभेत बहुतांश नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सभा सोमवारी छ. शिवाजी सभागृहात झाली. पाण्याबाबत नियोजन नसल्याने लोकांना टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बहुतांश नगरसेवकांनी यावेळी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, ‘शहरातील नागरिक वारंवार पाणीटंचाईमुळे पालिकेत येतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता येत नाही, हे असंच सुरू राहिलं तर मोठा संघर्ष होऊ शकतो.’अॅड. दत्ता बनकर यांनी सुधारित पाणी योजनेच्या कामाबाबत तीव्र स्वरूपात चिंता व्यक्त केली. मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर कारवाई करण्याची तयारी सुरू करा, ही योजना पालिकेने ताब्यात घेतली, तर वेगाने हे काम पूर्ण होईल, असे सांगितले. नगरसेवक तुषार पाटील यांनी शहरातील ९० टक्के नळांना तोट्या नसल्याचा आरोप केला. पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे असून, शहरातील बोअरवेल लोकसहभागातून दुरुस्त केल्यास पाणीटंचाईची चिंता मिटू शकते, असे सांगितले. नगरसेवक प्रवीण पाटील, कल्याण राक्षे, निशांत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेऊन आपली मते नोंदवली. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक-घोरपडे यांच्या स्मारकाचा विषय सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या स्मारकामुळे कर्नल संतोष यांची स्मृती कायम राहणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे स्मारकाचे संकल्पक अॅड. दत्ता बनकर यांनी सांगितले. ई निविदा मागविताना बयाणा रक्कम पालिकेकडे जमा व्हावी, शासनाच्या विविध योजनांमधील कामांची निवड करून मंजुरी देणे, शनिवार पेठेतील वाहनतळ आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर...!हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाला मंजुरी देताना नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांच्यासह सर्वच नगरसेवक भावूक झाले होते. अॅड. बाळासाहेब बाबर यांनी तर हुतात्मा गीताच्या ओळी म्हणून कर्नल संतोष यांना आदरांजली वाहिली. ‘जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर जान देने की ऋतू रोज आती नहीं...!’ अशा शब्दांनी अॅड. बाबर यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. या स्मारक उभारताना त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने ठेवण्याची अपेक्षा अॅड. बाबर, रवींद्र झुटिंग यांनी केली. या विषय मांडल्याबद्दल सर्वांनी अॅड. बनकर, अध्यक्ष व उपाध्यक्षांचे कौतुकही केले.
सुधारित पाणी योजना पालिकेकडे द्या
By admin | Updated: December 1, 2015 00:14 IST