पाटण : अचानक ट्रॅक्टर न्युट्रल होऊन त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तेथे खेळणारी चार वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. पाटण शहरातील कळके कॉलनीनजीक मुळगाव पुलाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. दुर्वा राहुल कांबळे (वय ४) असे मृत मुलीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना विभागातील हुंबरळी येथील राहुल बबन कांबळे हे पत्नी व मुलांसह गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाटण शहरातील चाफोली रोडवरील गुजर चाळीत वास्तव्यास आहेत. पाटणमधील वीटभट्टीवर काम करून पती-पत्नी आपल्या कुुटुंबाची गुजराण करत आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे ते मुलांसह कळके कॉलनीनजीक मुळगाव पुलाजवळ असलेल्या वीटभट्टीवर कामावर गेले होते. त्याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमध्ये (क्र. एमएच ११ व्ही ७५४२) बसून मुले खेळत होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेळता-खेळता मुलांकडून ट्रॅक्टर न्युट्रल झाला. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेली दुर्वा कांबळे ही अचानक ट्रॅक्टरमधून खाली पडली आणि तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. नागरिकांनी तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पंचनामा पाटण पोलिसांनी केला आहे.