वडूज : देशात स्वच्छता मोहिमेचे वारे जोरात वाहत असताना इकडे वडूजमधील काही भागांत याचे महत्त्वच न समजल्याचे दिसते. ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. घंटागाडी दारी... तरी कचरा रस्त्यावरी, अशी अवस्था काही परिसरात आढळून येत आहे.आपले अंगण व आपला परिसर स्वच्छ असावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम राबविली. या पाठीमागचे कारण ही स्पष्ट असून, दिवसन्दिवस देशात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम सर्व देशभर राबविली जात आहे. वडूजमधीलच काही घटक (माणसे) दर रविवारी स्वच्छता मोहीम न चुकता राबवित आहेत. काही भागांतील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परंतु हे ढीग काढायचे कोणी? यावर एकमत न झाल्याने ढिगाऱ्यामध्ये कचऱ्याची वाढ होत आहे. वडूज परिसरातील अपुऱ्या नागरी सुविधा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे झपाट्याने होणारी घरे, दुकाने व दवाखाने यामुळे दैनंदिन स्वच्छता करताना ग्रामपंचायतीला मर्यादा पडत आहेत.वडूजमधील काही युवक हनुमान वॉर्डमध्ये वास्तव्यास आहेत. ते दर रविवारी या वॉर्डमधील स्वच्छता करीत असतात. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा आशयाचा संदेश सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दखल घ्यायची कुणी. थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून सर्वजण नामनिराळे होत आहेत. वडूज ग्रामपंचायतीकडे दोन घंटागाडी व ट्रॅक्टर-ट्रॉली असून, नऊ आरोग्य कर्मचारी असा ताफा आहे. मात्र दैनंदिन काही प्रमुख भागातील स्वच्छता (गटार काढणे), बाजार पटांगण लोटणे आदी कामातच आठवडा जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. इच्छाशक्ती असूनही ग्रामपंचायतीला हा अतिरिक्त भार पेलवेना. त्यामुळे गरज आहे ती वडूजकरांनी आपल्याच मानसिकतेत बदल करण्याची आणि स्वत:चा परिसर स्वत:च स्वच्छ करण्याची.दैनंदिन घंटागाडी प्रत्येक वॉर्डमधील गल्ली बोळातून फिरत असते; परंतु धगधगत्या जीवनात (स्वत:च निर्माण करून घेतलेल्या) घंटागाडी येण्याची वाट पाहण्या इतकासुद्धा वेळ नसलेल्या वडूजकरांनी काही परिसरातील सार्वजनिक, वादग्रस्त जागेत, गटारामध्ये कचरा टाकणे सोयीचे मानत आहेत. आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून त्यांचे व स्वत:चे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. (प्रतिनिधी)नोटिसा बजावणारकाही भागात तोंडी सूचना देऊनही जाणीवपूर्वक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून प्रथम नोटिसा बजावणार आहे. ग्रामस्थांकडून या प्रकरणी जर काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर प्रसंगी संबंधितांवर कठोर निर्णय घेणार असल्याचे सरपंच कांताताई बैले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घंटागाडी दारी... कचरा रस्त्यावरी
By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST