सातारा : ‘सध्याच्या भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. बळीराजा आणि पशुधन पाण्यासाठी टाहो फोडत आहे. इतकी भयानक परिस्थिती असूनही सरकार मात्र दुष्काळी उपाययोजनांबाबत कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आहे. अधिकारी जनतेशी प्रतारणा करत आहेत. अधिकाऱ्यांना तीन-चार किलोमीटरवरून पाणी आणायला सांगा,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळावरील चर्चेदरम्यान केला. आमदार गोरे म्हणाले, ‘पाठीमागच्या सरकारने दुष्काळात अनेक चांगले निर्णय घेत बऱ्याच उपाययोजनाही केल्या होत्या. पाणी प्रश्नावरून मागेल तिथे टँकर आणि पशुधनासाठी चारा छावण्या दिल्या होत्या. त्यासाठी जाचक अटी घालून कागदी घोडे नाचविले नव्हते. सध्याचे सरकार मात्र दुष्काळाबाबत गंभीर नाही. माझ्या माण-खटावमध्ये आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. परंतु जनावरांसाठी एकही छावणी सुरू करण्यात आली नाही. मुंबईतून छावण्यांचा आदेश निघाला आहे. मुख्यमंत्रीही तसे सांगत आहेत. मात्र आमच्याकडे अद्याप छावण्या सुरू नाहीत. छावणीसाठी ५०० जनावरांची जाचक अट घालण्यात आली आहे. ५०० जनावरे नसतील तर छावणीच सुरू करता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दिलेले टँकरचे प्रस्ताव तीन-तीन महिने पडून राहत आहेत. गावातील पाण्याचे सगळे स्रोत संपले आहेत. तीन-चार किलोमीटरवर एखाद्या बोअरवेलला थोडेफार पाणी असेल तर तलाठी अधिग्रहण प्रस्ताववर पाठवत आहेत. तहसीलदार त्यामुळे टँकर प्रस्ताव मान्य करीत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना तीन-चार किलोमीटरवरून पाणी आणायला सांगा म्हणजे जनतेच्या हालअपेष्टा कळतील,’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी) निकषात बसणाऱ्या आत्महत्या कराव्यात का?माझ्या माण-खटावच्या भागातील शेतकरी कायम संघर्ष करत दुष्काळी परिस्थितीला धैर्याने तोंड देत आला आहे. आमच्या भागात सहसा शेतकरी आत्महत्या होत नाहीत. पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी परिस्थितीशी हार मानून एका बळीराजाने आपली जीवनयात्रा संपविली. त्या शेतकऱ्याला शासनाची मदत मिळण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यासंदर्भात तहसीलदारांनी ती आत्महत्या निकषात बसत नसल्याचे मला सांगितले. आता शेतकऱ्यांनी आमच्या निकषात बसणाऱ्या आत्महत्या कराव्यात असा नवीन अध्यादेश सरकारने काढावा, असा टोलाही आमदार गोरेंनी लगावला.
अधिकाऱ्यांना पाण्यासाठी घागरीसह पळवा !
By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST