सातारा : ‘लोकमत’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान मंडळींचा गौरव सोहळा शनिवार, दि. २३ रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नांचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी सातारकरांच्या नावाचा उद्घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘लोकमत’ दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून प्रत्येक वर्षी वर्धापनदिन साजरा करताना सातारकरांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या एका समाजघटकाचा सन्मान करणारे विशेषांक प्रसिद्ध केले. प्रगतिपथावर आगेकूच करताना सातारकर सुदृढ असायला हवेत आणि त्यांना तसे ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा उचित गौरव व्हायला हवा, या हेतूने यावर्षी ‘हेल्दी सातारा’ हा विषय ‘लोकमत’ने घेतला. साताऱ्याला निरोगी व सुदृढ ठेवण्यात बहुमूल्य योगदान आहे. म्हणूनच, या कर्तृत्ववान सातारकरांचा गौरव सोहळा आयोजित केला आहे. याचवेळी मनोरंजनाचा विशेष कार्यक्रमही होणार असून, उपस्थिती राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ तर्फे उद्या गौरव सोहळा
By admin | Updated: May 22, 2015 00:16 IST