रिफ्लेक्टरची मागणी
मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.
दुभाजकात गवत वाढले
ओगलेवाडी : ओगलेवाडी रेल्वे स्टेशन ते ओगलेवाडी येथील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. तसेच काही ठिकाणी दुभाजक ढासळलेलेही आहेत. याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुभाजकातील वाढलेल्या गवतामुळे त्याचे सौंदर्य नाहीसे होत आहे. तर ओगलेवाडी रेल्वे पूल ते कृष्णानाका येथील मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळ आपट होत आहे.
पाणंद रस्त्याची दुरवस्था
तांबवे : किरपे-सुपने येथील पाणंद रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, तोही सध्या निघून गेला असून, रस्त्यावर सध्या खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. किरपे-सुपने या दोन्ही गावांना जोडणारा हा पाणंद रस्ता असून, या रस्त्याचा वापर हा येणके, तांबवे, कोळे, किरपे येथील ग्रामस्थ तसेच प्रवाशांकडून वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
विद्यार्थ्यांचा पायी प्रवास
पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
वाहनचालक त्रस्त
कोयनानगर : मोरणा भागात येणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांची बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे. या विभागातील प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
फलक नसल्याने फसगत
कऱ्हाड : वाठार, रेठरे बुद्रुक ते शेणोली स्टेशन या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांची तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाठार ते रेठरे बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महामार्गावरून येणारी आणि कृष्णा कारखान्याकडे जाणारी वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होतात. मात्र, या मार्गावर कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. दिशादर्शक फलकांअभावी नवीन वाहन चालकांची फसगत होत आहे.