भुर्इंज : देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे शांतता, अहिंसा, सुधारणावादी, परिवर्तनवादी, सर्वोदयी विचार मागे पडू लागले आहेत. भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या वाई आगमनाच्या शताब्दी वर्षात गांधी-विनोबांचे गांधीवादी व सर्वोदयी विचार सातारा जिल्ह्यासह राज्य-देशात अधिक बळकट करू या, असा निर्धार करण्यात आला. भुर्इंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दोन दिवसीय सर्वोदयी कार्यकर्ता शिबिरात हा निर्धार करण्यात आला. अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ रोडे, माजी अध्यक्ष व वर्धा येथील सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष व नई तालीम संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, माजी अध्यक्ष शंकर बगाडे, विचारवेध संमेलनाचे प्रवर्तक किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ सर्वोदयी कार्येकर्ते रसिकलाल गांधी, श्री कोटेश्वर देव ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त विजय दिवाण व सर्वोदयी कार्यकर्त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या आचार्य विनोबा भावेंनी शासन व शोषणमुक्त अहिंसक समाजरचनेसाठी सर्वोदय समाज संघटनेची स्थापना १९४८ मध्ये केली. जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकचंद दोशी, लालासाहेब इंगळे, डॉ. वा. वि. आठल्ये, रामानंद भारती आदींनी सातारा जिल्ह्यात सर्वोदय समाजाचे कार्य सुरू केले. बाबूलाल गांधी, अण्णासाहेब जाधव, तात्या दीक्षित, दिनकरराव भोसले, किसन जाधव या तरुण मंडळींनी तत्कालीन परिस्थितीत सातारा जिल्ह्यात सर्वोदयाच्या कार्याला गती दिली. १९५३ ते १९७३ या दोन दशकांत जिल्ह्यातील सर्वोदय चळवळीचे काम संघटितरीत्या मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतर या चळवळीतील जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांना वयोमानाने सर्वोदयी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यास मर्यादा आल्या. सर्वोदयी कार्यकर्ते विखुरले जाऊन या चळवळीचे काम जवळजवळ मंदावले. या शिबिरात अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे सचिव शेख हुसेन, महामंत्री चंद्रकांत चौधरी, सेवाग्राम आश्रमचे सचिव श्रीराम जाधव, मंत्री शोभा शिरढोणकर, सहकार चळवळीचे अभ्यासक अशोक काळे, सर्वोदयी कार्यकर्ते बाबूलाल गांधी, चेतना सिन्हा, रसिकलाल दोशी, जीवन इंगळे, बाबासाहेब इनामदार, अनिल जोशी, डॉ. शंतुनू अभ्यंकर, संजय पुराणिक, मारुती भोसले, माधवी गांधी यांच्यासह सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते उपस्थितहोते. (प्रतिनिधी)
गांधी, विनोबांचे सर्वोदयी विचार बळकटीचा निर्धार
By admin | Updated: December 1, 2015 00:12 IST