सातारा : पाल येथील श्री खंडोबा यात्रा मिरवणुकीतील ‘रामप्रसाद’ हा देखणा गजराज पुढील वर्षीपासून स्वतंत्र मार्गावरून दिमाखात चालेल. सुरक्षित अंतरावरून भाविक त्याच्यावर भंडाऱ्याची उधळण करतील आणि मिरवणूक निर्धोक झाल्यामुळे यात्रेकरूंचा आनंद शतगुणित होईल, अशी चिन्हे आहेत. हत्तीसाठी स्वतंत्र ‘ट्रॅक’ तयार करण्याच्या ‘लोकमत’च्या संकल्पनेचे प्रशासनाकडून स्वागत झाले असून, देवस्थान ट्रस्टनेही त्यानुसार नियोजन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. शनिवारी (दि. ३) पाल येथील खंडोबा यात्रेतील मिरवणूक दिमाखात सुरू असताना भाविकाने उधळलेली लोकर हत्तीच्या सोंडेत जाऊन हत्ती बिथरला आणि त्याच्या हालचालींमुळे पळापळ झाली. या घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला होता. या धावपळीमुळे दहा वर्षांपूर्वी मांढरदेव यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची अनेकांना आठवण झाली. भविष्यात मोठा अनर्थ टाळण्याच्या दृष्टीने परंपरा अबाधित राखून नियोजन व्हावे, अशी भूमिका ‘लोकमत’ने घेतली. वारीतील रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर हत्तीसाठी स्वतंत्र ‘ट्रॅक’ करण्याची संकल्पना मांडली. यामुळे भाविकांच्या भावनांबरोबरच यात्रेची परंपरा अबाधित राहील आणि धोका कमी होऊन आपत्कालीन नियोजन सोयीचे होईल, असा विचार त्यामागे होता.मांढरदेव यात्रेत २००५ मध्ये मोठा अनर्थ घडल्यावरच नियम तयार झाले. परिसरात वाद्य वाजविणाऱ्यांवरही तेथे आता कारवाई केली जाते. परंतु अशा मोठ्या अघटिताची वाट न पाहता आधीच खबरदारी घेण्याचे पाल देवस्थानने यंदाच्या दुर्घटनेनंतर ठरविले आहे. त्या अनुषंगाने केवळ चुका अधोरेखित करून, नियम-कायदे सांगून, दोषारोप न करता पर्याय शोधण्याची भूमिका ‘लोकमत’ने स्वीकारली, याबद्दल देवस्थान ट्रस्टसह प्रशासनानेही ‘लोकमत’चे अभिनंदन केले. सहमतीच्या, एकविचाराच्या या वाटचालीत प्रशासनासह अॅनिमल वेल्फेअर आॅफिसर डॉ. अमित सय्यद, उच्च न्यायालयाच्या कायदा समिती सदस्या सुनेत्रा भद्रे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) सुभाष पुराणिक, हत्तीचे माहूत वाहिद आणि जावेद रहिमतुल्ला शेख आदींनी ‘लोकमत’ला सहकार्य केले. (प्रतिनिधी)परंपरा आणि लोकभावना जपतानाच यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. हत्तीचा मिरवणुकीतील सहभागच टाळावा, अशी टोकाची भूमिका न घेता ‘लोकमत’ने हत्तीसाठी स्वतंत्र मार्ग बनविण्याचा उत्तम तोडगा सुचविला आहे. घडल्या प्रकाराबद्दल केवळ दोषारोप न करता अत्यंत सकारात्मक विचार करून हा उपाय सुचविण्यात आला असून, तसे घडल्यास यात्रा निर्विघ्न होणार आहे. पुढील वर्षीपासून हत्तीसाठी स्वतंत्र ‘ट्रॅक’ तयार केला जाईल.- देवराज पाटील, अध्यक्ष, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, पालअधिकाऱ्यांनी उचलून धरली संकल्पना‘लोकमत’ची भूमिका वाचली. त्या दृष्टीने काय करता येईल, याचा विचार आम्ही करीत आहोत. पाल यात्रेत घडलेल्या घटनेची चौकशी सध्या सुरू असून, अहवाल आल्यावर नेमके काय घडले हे स्पष्ट होईल. परंतु ‘लोकमत’ने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून नियोजन कसे करता येईल, यासंदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी‘लोकमत’ची भूमिका खूप आवडली. हत्तीवरील मानकऱ्यांच्या छातीशी देवाच्या मूर्ती बांधलेल्या असतात. त्यावर भाविक भंडारा, प्रसाद उधळतात. त्या माऱ्यामुळे हत्ती बिथरण्याची शक्यता असते. मूर्तींची प्रतीकात्मक पूजा करून नंतर मिरवणूक सुरू करावी, यासाठी पुढील वर्षी प्रयत्न केले जातील. तसेच नदीच्या वाळवंटात पूल नसल्यामुळे गर्दी वाढते. तेथे पूल उभारून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न होईल. हत्तीसाठी स्वतंत्र मार्गाची ‘लोकमत’ची सूचना वास्तवास धरून आहे आणि त्या दृष्टीने नियोजन केले जाईल.- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षकप्रत्येक वेळी कायदा आणि नियम सांगितल्यास भावनेचा प्रश्न निर्माण होतो आणि केवळ संघर्षच होतो. त्या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’ने मांडलेली भूमिका अत्यंत संतुलित आहे. अशा प्रकारे नियोजन केल्यास हत्तीलाही त्रास होणार नाही आणि यात्रेकरूही सुरक्षित राहतील. शिवाय, कोणाच्या भावनेलाही धक्का लागणार नाही.- एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक, सातारा
गजराजांची स्वारी येणार ‘राजमार्गा’वरून!
By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST