सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे संदेश पाठवून समाजाची दिशाभूल केली जात असून, त्याबाबत अधिक दक्ष राहणे आणि सावधान राहणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने होत असताना लोकांची दिशाभूल करणारे अनेक महाभाग समाज माध्यमांवर गैरसमज पसरविणारे संदेश पाठवत आहेत. काही लोक विचार न करता ते पुढे पाठविताना दिसतात. रविवारी रात्रीपासून समाज माध्यमांवर ''सातारा जिल्ह्याच्या सीमा मध्यरात्रीपासून बंद'' असा ब्रेकिंग न्यूज टॅग लावून संदेश फिरतो आहे. वास्तविक, जिल्हाधिकार्यांनी असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत.
या संदेशामध्ये जिल्ह्यातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले आहे. हा संदेश अनेक वेळा समाज माध्यमांतून पुढे पुढे ढकलला गेल्याने लोकांमध्ये गैरसमज असल्याचे चित्र होते. लोक कुठलाही विचार न करता आपल्या मोबाईलवर पडलेला मेसेज पुढे पाठविण्याचे काम करतात. अधिकृत माध्यमातून असे मेसेज आले नाहीत किंवा वृत्तपत्रांमध्ये देखील याबाबत कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाने केलेली नाही. तरीदेखील केवळ माहिती मिळाली की ती पुढे पाठवायची या अंधश्रद्धाळू भावनेतून लोक आलेला मेसेज पुढे ढकलतात आणि समाजामध्ये गैरसमज पसरताना दिसतो.
कोरोना महामारीचा काळ सगळ्यांसाठीच काळजी घेण्याचा आहे. माणसाच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असलेला विषय काहीजण गमतीने घेत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील भीती काढून टाकणे तसेच ही व्याधी होऊ नये, यासाठी कोणती आदर्श जीवनशैली अंगीकारायची याबाबत संदेश पाठवून प्रशासनाला मदत करण्याऐवजी सर्वांचीच डोकेदुखी वाढविण्याचे काम हे संदेशवाहक करत आहेत.
कोट..
समाजमाध्यमांवर चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे संदेश पाठविले जात आहेत. लोकांनी सावध राहावे. आलेला मेसेज फॉरवर्ड करण्याआधी पूर्णपणे विचार करावा. सीमा बंदीचा निर्णय घेतलेला नाही. चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा