म्हसवड : येथील केंद्रीय वसतिगृहातील कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना माणदेशी फाउंडेशनतर्फे प्रभात सिन्हा यांच्या हस्ते फळे, सुका मेवा व खाद्य पदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काकडे, खंडेराव सावंत, कुशल भागवत, सारंग नवाळे, बंटी पंतगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले की, ‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी माण देशी फाउंडेशनकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, पुणे येथील ससून रुग्णालय, तसेच मायणी येथील मेडिकल कॉलेज संचलित कोविड रुग्णालयासही यापूर्वी भरीव अशी मदत केलेली आहे.’
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माणदेशीच्या योगदानातून स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू केले आहे. येथील रुग्णांना दररोज सकस व पौष्टिक आहारासहित फळे व प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या खाऊचे वाटप केले जात आहे. हा उपक्रम कोरोनाबाधित रुग्णांस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.
फोटो : १९ माणदेशी फाउंडेशन
माणदेशी फाउंडेशनचे प्रभात सिन्हा यांच्या हस्ते कोरोनाबाधित व्यक्तींसाठी फळे, तसेच खाऊचे मोफत वाटप करण्यात आले.