कऱ्हाड : विंग, ता़ कऱ्हाड येथील वाघझरा परिसरात मोकाट गार्इंचा उपद्रव सुरूच असून, नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अडीच ते तीन एकरातील गहू पिकाचे गार्इंनी नुकसान केले.विंगमध्ये विठ्ठलाई डोंगर पायथा परिसरातील रब्बीतील गहू, संकरित ज्वारी या पिकांना मोकाट गार्इंनी लक्ष्य केले आहे़ पिकेही सध्या ऐन भरात आहेत़ मात्र, मोकाट गायींपासून पिकांना धोका निर्माण झाला आहे़ नुकताच या परिसरात तब्बल अडीच-तीन एकरांतील गव्हावर त्यांनी हल्ला चढवला़ ऐन भरात असणारा गहू रातोरात फस्त केला़ वारंवार राखण करूनही एकच रात्र राखणीसाठी जाण्यास विलंब झाल्याने हा प्रकार घडला, असे शेतकऱ्यांनी सांगितले़ हातातोंडाला आलेले पीक रातोरात फस्त झाल्याचे पाहून शेतकरी अक्षरश: हताश झाले आहेत़ शेताभोवतीचे तारेचे कुंपण तोडून त्या आत घुसल्याचे त्याठिकाणचे दृश्य आहे़ चंद्रकांत तातोबा पाटील, सुरेश तातोबा पाटील, जलिंदर जगन्नाथ पाटील, सुनील पाटील आदी शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे़ दिवसंरात्र काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी आणलेली पिके रातोरात नष्ट होऊ लागली आहेत़ मागील पंधरवाड्यात त्या परिसरातील कुंभारमळा येथे गार्इंंनी पिकाचे नुकसान केले होते़ पंधरा दिवसांत पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली आहे़ किमान लहान मोठ्या पन्नास गार्इंचा कळप आहे़ रात्रीच्या वेळी उभ्या पिकांत त्या घुसत आहेत़ पहाटेच्या वेळी नजीकच्या डोंगरात पोबारा करत आहेत़ अनेकदा शेतकरी राखणीला असतानाही कानोसा घेऊन त्या पिकात घुसून नुकसान करत आहेत़ याप्रश्नी अनेकदा वनविभाग, महसूल विभागाला कळवूनही त्याकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ पीक राखण्यासाठी शेतकऱ्यांनी माळे बांधले आहेत़ अनेकदा शेतकरी झोपेत असताना पिकांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)
विंगला मोकाट गार्इंकडून पिकांचे वारंवार नुकसान
By admin | Updated: January 20, 2015 00:02 IST