लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी पार्लेच्या सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, अविनाश नलवडे, सोसायटीचे सचिव संभाजी नलवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. घाडगे आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु, नागरिक ही बाब गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव किंवा फैलाव गावात होऊ नये म्हणून पार्ले ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांच्या सहकार्यातून घेतलेल्या कोरोना तपासणी शिबिरात गावामधील किराणा दुकानदार, सलूनचालक, दूध डेअरी चालक, सेवा सोसायटीचे कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पानपट्टीधारक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रिक्षाचालक यांची मोफत तपासणी करण्यात आली.