लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाकाळात अडचणीत असलेल्या सामान्यांना आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनसेच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विराेधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिली.
कोरोनाकाळात सर्वांचे उद्योगधंदे, नोकऱ्या ठप्प झाल्या असताना वीजबिल कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाठ, अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेले. सर्वकाही ठप्प असताना अशा बिकट परिस्थिती सर्वसामान्य माणसाला हे बिल भरणे केवळ अशक्यच होते. हाच जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मनसेने हाती घेऊन बाळा नांदगावकर व पक्षाचे शिष्टमंडळ हे काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी यावर आम्ही नक्की विचार करू व लवकरच गोड बातमी देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले. त्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते पदाधिकारी यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली या भेटीत चर्चा करून त्यांनी आम्ही लक्ष घालून योग्य ते निर्णय घेऊ, असे कळवले.
यानंतर ऊर्जामंत्र्यांनी स्वतःच्या विधानावरून घूमजाव करून सांगितले की वीजबिल हे सर्वांना भरावेच लागेल. याच मुद्द्यावर आक्रमक होऊन राज्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या, फसवणाऱ्या खोटे बोलणाऱ्या ऊर्जामंत्र्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आणि प्रजासत्ताकदिनी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहर मनसेतर्फे सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले
यावेळी ॲड, मुश्ताक बोहरी, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, शाखाध्यक्ष चैतन्य जोशी, अविनाश भोसले, अनिकेत साळुंखे आदी उपस्थित होते.