सातारा : पावणेचार महिन्यांपूर्वी यवतेश्वर पठारावर फिरावयास गेलेल्या पर्यटक दाम्पत्याचा ऐवज चोरून नेणाऱ्या चार तरुणांना सातारा स्थानिक गुन्हे शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल वसूल केला आहे. सुरज नलवडे, सुरज मोहिते, प्रदीप पवार, संतोष चौगुले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीकांत संपत खंडजोडे आणि पत्नी पियुशा (रा. १३१, केसरकर पेठ, सातारा, सध्या रा. वाकड, पुणे) हे दि. २३ जुलै रोजी यवतेश्वर पॉवर हाऊस येथे फिरावयास गेले होते. पॉवर हाऊसवर फोटो काढत असताना पत्नी पियुशा यांनी त्यांची पर्स शेजारीच असणाऱ्या जलवाहिनीवर ठेवली होती. या पर्समधून दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड, लायसन्स असा ५८,५00 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या घटनेनंतर श्रीकांत खंडजोडे यांनी सातारा तालुका पोलीस तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना त्यांच्या खबरीने दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्देमाल सुरज उर्फ गजू अशोक नलवडे आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून लंपास केला असल्याची माहिती मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, स्वप्नील शिंदे, विक्रम पिसाळ, चालक विजय सावंत यांना पुढील तपास करण्याचे आदेश दिले. यानंतर सुरज उर्फ गजू नलवडे (वय २२, रा. ४३९, मंगळवार पेठ, बोगदा, सातारा) याला त्याच्या राहत्या घरी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या चोरीप्रकरणी अधिक माहिती घेतली असता सुरज उर्फ विकी संजय मोहिते (वय २१), प्रदीप उर्फ पप्पू दीपक पवार (वय २१), संतोष आनंदा चौगुले (वय २२, सर्व रा. ४३९, मंगळवार पेठ, बोगदा, सातारा) आणि स्वत: अशी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीतील मोबाईल, दोन सोन्याच्या बांगड्या असा ५७ हजार रुपयांचा ऐवज चौघांकडून हस्तगत केला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास करण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
दाम्पत्याचा ऐवज चोरणाऱ्या चार तरुणांना अटक
By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST