सातारा : शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, खेड, वाढे फाटा आणि बॉम्बे रेस्टॉरंट येथे गुरुवारी रात्री चार दुकाने फोडून १६ हजारांचा ऐवज चोरून नेला.
खेड चौकात असणारी चार दुकाने एकाच दिवशी फोडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी रमेश सोमाराम चौधरी (वय २२, रा. सुंदरा गार्डन, बिल्डिंग नंबर ५, विसावा नाका, पुष्कर हॉलसमोर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चारही दुकाने गुरुवार, दि. ४ रोजी सायंकाळी सात ते शुक्रवार, दि. ५ रोजी सकाळी सव्वानऊ या कालावधीत फोडली आहेत. महालक्ष्मी सिरॅमिक ॲण्ड ग्रेनाईट हे दुकान खेड चौकात असून, चोरट्यांनी दुकान बंद असताना मागील दाराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आतमध्ये असणाऱ्या टेबलच्या ड्राॅवरमधून ३ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मनोज मार्बल या दुकानाकडे वळविला आणि येथील ड्राॅवरमधून ९ हजारांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी जवळच असणारे वाढे फाटा येथील एमआरएफ टायर हाऊस फोडून तेथील टेबलच्या ड्राॅवरमधून साडेतीन हजार रुपयांची रोकड लंपास केली. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात असणारे श्रीकृष्ण सेल्स कॉर्पाेरेशन हे भांड्याचे दुकानही चोरट्यांनी फोडले असून, या दुकानातील काउंटरमधून ६०० रुपयांची रोकड, असा १६ हजार ७३० रुपयेे चोरून नेले. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक राहुल दळवी हे करत आहेत.