महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमीन खचली, भेगा पडल्या. यामुळे झालेल्या भूस्खलनाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भूगर्भ शास्त्रज्ञांना महाबळेश्वर येथील मेटतळेपासून चार किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. या पाहणीचा अहवाल ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोलादपूर ते महाबळेश्वरपर्यंत अंबेनळी घाटात २७ ठिकाणी दरड पडणे, रस्ते खचणे, दगड-माती रस्त्यावर आली. यामुळे घाट काही दिवस बंद होता. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेटतळे धबधब्यापर्यंत पोलादपूरपर्यंत रस्ता खुला केला. महाबळेश्वरपासून मेटतळेपर्यंत रस्ता सुरू आहे. मधला तीन चार किलोमीटर रस्ता बंद असल्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांनी पायी प्रवास करून प्रतापगड परिसरातील गावाची भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी केली. महाबळेश्वर तालुक्यातील पंधरा ते वीस गावांतील जमिनीची पाहणी केली. भूस्खलनामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही भेट होती, अशी माहिती महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील दिली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. पश्चिम भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते वाहून गेल्याने या भागातील बावीस गावांचा संपर्क तुटला होता. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर उतारावरून भुस्खलन झाले. दरडी कोसळल्या. दगडमाती नदीत व तेथून नदीपात्रालगत असलेल्या शेतजमिनीत गेली. अनेक नद्यांनी आपले प्रवाह बदलले. त्यामुळे नदीकाठी असलेल्या घरात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली. जमिनी जागोगाजी खचल्या अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या. दोन दिवसांत झालेल्या पावसाने अनेक गावांवर जमिनीमध्ये गडप होण्याचा धोका उद्भवला होता. काही ठिकाणी दरड कोसळून अनेक गावांवर माळीणसारखी परिस्थिती ओढवली होती.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी २५ पेक्षा अधिक गावांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. दरे, दुधोशी, कोंडोशी, धावली, घावरी, चिखली, एरंडल दरे, दुधोशी, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द, आचली, नावली, चतुरबेट, कुमठे, शिंदोळा भेकवलीवाडी,
या गावांचे पुनर्वसन कोठे करायला हवे, ती जागा भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहिली. त्यानंतर केलेला अहवाल काहीच दिवसांमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देणार आहेत, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील यांनी दिली.
चौकट
मुळाशी जाण्यासाठी अभ्यास
महाबळेश्वरला भूस्खलन, दरडी कोसळणे नवीन नाहीत. परंतु यंदा या प्रकारांची मालिका तयार झाली. एकाचवेळी अल्पावधीत सर्व प्रकारची आपत्ती कोसळली. यातून सावरण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. भूस्खलनाच्या मुळाशी जाऊन अभ्यास व्हायला हवा, यासाठी हा दौरा होता. यामध्ये परिमिता मॅडक, रिंपी गागई यांचा समावेश होता. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील उपस्थित होते.
२८महाबळेश्वर-सायंटिस्ट
महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या भूस्खलनाचा भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञांनी कित्येक किलोमीटरची पायपीट करून पाहणी केली.