सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल अडीचशे जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. एकीकडे कोरोनाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे मात्र अपघातांंचे सत्र सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने गेल्या पावणेदोन वर्षांपासून तळ ठोकला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर दिवसाला कोरोनाचे तब्बल चाळीस बळी जात होते. त्यामुळे सारे प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी एकवटले असतानाच दुसरीकडे मात्र अपघातांचे सत्र सुरू झाले. कोरोना काळात महामार्गावर वाहनांची रहदारी अत्यंत कमी होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले लोक महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत वेगाने जात होतो. या वेगानेच बऱ्याचजणांचा बळी घेतलाय. कोणाच्या गाडीचे टायर फुटले तर कोणाच्या कारचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली तर काही वाहनांचे समोरासमोर अपघात झाले. यामुळे साहजिकच बळींचे प्रमाण वाढले. हे अपघात केवळ महामार्गावरच नव्हे तर आंतरजिल्हा रस्त्यांवरही झाले आहेत. कोरोनाच्या धांदलीमध्ये अपघातात इतक्या जणांचे बळी जाऊनही अपघाताविषयी कुठेही फारशी वाच्यता झाली नाही. त्याचे कारण म्हणजे लोक कोरोनाच्या दडपणाखाली वावरत आहेत.
सात महिन्यांत अडीचशे लोकांना अपघातात नाहक जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एकीकडे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतोय. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ३९ जणांचा मृत्यू झालाय. या काळात अनेकजण नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यातील बहुतांश अपघात हे रात्रीच्यावेळी झाले आहेत. ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. काही ठिकाणी रस्ते चांगले नसल्याचाही अहवाल तयार करण्यात आलाय. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत.
चाैकट : सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू...
जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल २५० जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १२८ हे दुचाकीस्वार असल्याचे समोर आले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागलाय. तितकेच जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये २३६ जणांचा समावेश आहे. या दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट घातले असते तर नक्कीच बळींचे प्रमाण हे अल्प राहिले असते, असे पोलीस सांगताहेत.