लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माजी सैनिकांच्या धर्तीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दुबळे यांनी केली आहे.
याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना कालावधीत दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांचे रोजगार गेले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही परवड थांबविण्यासाठी दिव्यांग बांधवांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचा फेरसर्व्हे करून पाच टक्के गाळ्यांचे ऑनलाईन पद्धतीने वितरण करावे, दिव्यांग खेळाडूंचा निधी प्राधान्याने वितरीत करावा, सर्व शासकीय व निमशासकीय इमारतींना लिफ्ट तसेच रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या गणेश दुबे यांनी केल्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे.