लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमा ठिकठिकाणी सध्या सुरू आहेत. रायगडाच्या संवर्धनासाठी स्थानिकांनी सर्वेक्षण करून गरजेची कामे सुचवावीत. ती पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी दिले.
रायगडाची गडदेवता शिरकाई देवीचे गडावर एक आणि पायथ्याशी एक मंदिर आहे. राजेशिर्के घराण्याची ही कुलदेवता असल्याने पायथ्याच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी सुहास राजेशिर्के यांनी पुढाकार घेतला होता. परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेले. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
राजेशिर्के यांनी गडाच्या परिसरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची सूचना ग्रामस्थांना केली. गडावरील कुलस्वामिनी आई शिरकाई मंदिराच्या नूतनीकरणासाठीही पुरातन खात्याशी सल्लामसलत करून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन राजेशिर्के यांनी दिले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सात वाड्यांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी छत्री निजामपूरच्या सरपंच प्रेरणा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी सुहास राजेशिर्के यांचे कौतुुक केले.
फोटो : ०६ सुहास राजेशिर्के
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिरकाई देवीचा कलाशारोहण सोहळा सुहास राजेशिर्के, स्नेहल राजेशिर्के व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.