कुडाळ : विकासात्मक दृष्टिकोन बाळगून जावळीच्या विकासाची भूमिका कायमच ठेवली असून, याकरिता कोणतेही राजकारण न करता लोकाभिमुख काम करण्यासाठीच प्राधान्य दिले आहे. कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही. यामुळे आपणही मृगजळाच्या मागे न जाता तुमच्या सुख-दुखात तुमच्यासोबत असणाऱ्यांशी ठाम पाठीशी राहा, असे मत सातारा जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सर्जापूर, ता. जावळी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण शुभारंभ अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदीप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनीषा बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी कोरोना काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, विकासकामांत सातारा जावळी असा भेदभाव कधीच केला नाही. जावळीच्या जनतेसाठी मी सतत झटत आहे. विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. यामुळे आपण विकास कोणाच्या माध्यमातून होत आहे, याचा विचार करावा. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर असून, जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो, त्याच्या पाठीशी कायम राहा. तालुक्यातील प्रतापगड कारखान्याचा प्रश्नही लवकरच सामंजस्याने सोडवण्यात येईल. याकरिता अजिंक्यतारा कारखाना व माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य राहील.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या अरुणाताई शिर्के, उपसभापती सौरभ शिंदे, सरपंच स्वागता बोराटे, देविदास बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले.
अतुल बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. कीर्तनकार नलावडे यांनी आभार मानले.