सातारा : पाटण तालुक्यातील संगमनगर येथून एका दुकानासमोरून वनरक्षकाची बॅग चोरीला गेल्याची तक्रार कोयनानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या बॅगमध्ये सहा मेमरी कार्ड असून, त्यामध्ये काही महत्त्वाची माहिती असल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दादासो विठ्ठल लोखंडे (वय ३२, रा. हेळवाक, रा. मळे, ता. पाटण, जि. सातारा) हे वन्यजीव विभागाकडे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवार, दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ते संगमनगर येथील मीनाज किराणा स्टोअर्स दुकानासमोर त्यांनी आपली दुचाकी (एमएच ११ सीडी १६९२) लावून तिला त्यांची सॅक अडकवली होती. ती बॅगच अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या बॅगमध्ये कॅमेरा ट्रॅपची सहा मेमरी कार्ड असून, त्याची साठवणक्षमता १८ जीबी असून, त्यामध्ये विविध वन्यप्राण्यांचे फोटो आहेत. बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच वनरक्षक दादासोा लोखंडे यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोबडे करत आहेत.