तांबवे येथे गत नऊ ते दहा वर्षापासून फुटबॉल या खेळाकडे युवक वळले आहेत. या गावासह परिसरातील युवकांनाच नव्हे तर ज्येष्ठांनाही फुटबॉल या खेळाने वेड लावले आहे. प्रतिवर्षी दीपावली सुटीमध्ये येथे फुटबॉल स्पर्धा होतात. लहान मुलांपासून तरुणांमध्येही या खेळाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. सर्व जण या खेळाकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळेच येत्या २० फेब्रुवारीपासून गावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘फुटबॉल टीम’ने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
गावात २०११-१२ साली ७ ते ८ युवकांनी फुटबॉल खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर युवकांचा सहभाग वाढत गेला आणि सध्या शंभरपेक्षा जास्त युवक व ग्रामस्थ या खेळामध्ये सहभागी होतात. अवघ्या सात वर्षांच्या मुलापासून पन्नास वर्षीय ज्येष्ठ ग्रामस्थांपर्यंत सर्व जणच यामध्ये सहभाग दर्शवितात. गावातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील या विद्यालयाच्या क्रीडांगणावर दररोज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे सर्व खेळाडू एकत्र येतात. तांबवेसह साजूर, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, आरेवाडी, साकुर्डी, किरपे, गमेवाडी, वसंतगड, डेळेवाडी, पश्चिम सुपने व कऱ्हाड शहरातीलही युवकही दररोज येथे येतात. खेळाडूंच्या दररोजच्या वाढत्या हजेरीमुळे तांबवे गाव फुटबॉलप्रेमींचे गाव म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे.
‘फुटबॉल टीम’ने खेळाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे. तसेच सन्मान परिवार असून त्यामध्ये शंभर सदस्य आहेत. त्याचबरोबर ‘ट्रेकिंग ग्रुप’ असून त्यामध्ये ४० सदस्य आहेत. फुटबॉलचे वेड असलेल्या या तांबवे गावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी पक्षाचे आ. रोहित पवार उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. श्रीनिवास पाटील असणार आहेत.
- चौकट
सामाजिक उपक्रमातही सहभाग
तांबवेतील कोयनाकाठ ट्रस्ट संचलित ‘फुटबॉल टीम’च्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती, घाटसफाई, कोरोना कालावधीत ग्राम स्वच्छता, औषध फवारणी करण्यात आली. त्याबरोबरच कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला.
- चौकट
विजेत्या संघांवर बक्षिसांचा वर्षाव
फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमाकांच्या विजेत्या संघास २५ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह, दुसऱ्या संघास १७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय संघास ११ हजार १११ रुपये व चतुर्थ संघास ५ हजार ५५५ रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २ हजार रुपये प्रवेश फी असणार आहे. तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या संघाची निवासाची व जेवणाची सोय केली जाणार आहे.
फोटो : ०९केआरडी०२
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथील अण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या याच प्रांगणात दररोज फुटबॉलचा खेळ रंगतो. (छाया : दीपक पवार)