लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे नागरिकही आता बेफिकीर होऊ लागले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये साेशल डिस्टन्सिंग कसलेही ठेवले जात नाही. पण काेरोनाच्या भीतीने रुग्णांच्या तोंडावर मात्र, मास्क दिसतायत. पहिल्यासारखी जर काळजी घेतली नाही तर कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातच कोरोना नियमांबाबत काय काळजी घेतली जाते, यावर ‘लोकमत’ने रियालिटी चेक केला असता अनेक त्रुटी आणि नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एकमेकांना खेटून रुग्ण उभे राहिले होते. रुग्णांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात नव्हते. परंतु कोरोनाच्या धास्तीने अनेकांच्या तोंडावर मात्र, मास्क पाहायला मिळाला. इथल्या रुग्णांना व रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांना हटकण्यासाठी सुरक्षा रक्षकही नव्हते. त्यामुळे साराच सावळागोंधळ असल्याचे दिसून आले.
चाैकट : ओपीडी हाऊसफुल
कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल होऊ लागली आहे. सकाळी आठपासून लोक केस पेपर काढण्याच्या रांगेत उभे राहत आहेत. डाॅक्टरांच्या ओपीडीलाही तितकीच गर्दी होतेय. सर्वसामान्य रुग्णांना मोफत सुविभा मिळत असल्याने अनेक जण शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्यासाठी प्राधान्य देतायत.
चाैकट : डेग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता डेग्यू आणि चिकुनगुनिचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांत डेग्यूचे ३८९ तर चिकुनगुण्याचे तब्बल ४६१ रुग्ण आढळून आले आहेत. या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. एकीकडे कोराेनातून आरोग्य विभाग उसंत घेत असतानाच आता डेंग्यू आणि चिकुनगुनियाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
चाैकट : रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये..
जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणे शहरातील इतरही रुग्णालयात अशाप्रकारे रुग्णांनी जर नियम न पाळले तर तिसऱ्या लाटेत रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरतील, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. यासाठी आतापासून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे.
कोट : रुग्णालयात आल्यानंतर प्रत्येक रुग्णाने नियम पाळणे गरजेचे आहे. यापुढे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क नसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तरी रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा