सणबूर : ग्रामीण भागात १९७० ते ८० च्या दशकात तसेच यापूर्वीही ग्रामीण भागात सर्रास दिसणारे वासुदेव, नंदीबैलवाले, कुडमुडे ज्योतिषी, बहुरूपी आदी कलाकार काळाच्या ओघात लोप पावत चालले आहेत.
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या सुगीला सुरुवात झाली. की ग्रामीण भागात गावगाड्यात लोककलाकारांची वर्दळ सुरू असायची. खळ्यावर रस्त्यावर कला सादर करून पोटाची खळगी भरली जात होती. अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातील हे चित्र बदले आहे. लोककला लोप पावत चालली आहे.
सुगीच्या काळात बळीराजाकडून पसाभर धान्य मिळण्यासाठी दारावर येणाऱ्या लोककलाकारामध्ये नंदी बैलवाले, सुतार, दाभण विकणाऱ्या महिला, अस्वल, माकडवाले, कोल्हाटी, डोंबारी, गोसावी, कडकलक्ष्मी, पिंगळा, जोशी, कुडमुडे ज्योतिषी अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. या कलाकारात शेतकरी बंधूंच्या मालकिणीच्या सासूचा आजींचा अशा अनेकांचा उद्धार मांडणारे गोंधळी मनकवडे आपला वेगळाच ठसा उमटवायचे याशिवाय गुबुगुबु करत नंदीबैलवाले पावसाचा लग्नाचा पैशाचा मान हलवत अंदाज सांगायचे.
या लोककलाकारांचे पोषाखही लक्ष वेधून घेणारे होते. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, त्यावर काळा कोट डोक्यावर पागोटे हातात तुणतुणे कमरेला घट्ट बांधलेले दोन पडघम काखेत झोळी अशा वेशातीलही मंडळी विविध गुणांचे दर्शन घडवत असे.
पोलिसांचा वेश घालून हसविणारा बहुरूपी हजर जबाबीपणामुळे लक्ष वेधून घेत असे . पिंगळा ज्योतिषी, वासुदेव आदींचा पोषाखही वेगळा असायचा. असे हे अवलिया बदलत्या परिस्थितीमुळे हरविले आहेत. अर्थात वरील प्रकारातील काही कला आजही काही लोकांनी जिवंत ठेवल्या असल्या तरी बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. अलीकडे त्यांचे दर्शन ग्रामीण भागात क्वचितच प्रसंगी दिसते
आजच्या तरुण पिढीला ही सर्व माहिती होण्यासाठी अशा दुर्लक्षित घटकांना एकत्रित आणून या समाजातील लोकांचे राहणीमान जीवनपद्धती संस्कृती या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
०१नंदीबैल
ग्रामीण भागात नंदीबालवाले दिसण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.