सातारा : खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाचजणांना वन विभागाने अटक केली आहे. वाई ते सुरुर फाटा या मार्गावरील हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉलजवळ ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत वन विभागाने खवले मांजर, एक चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, ही कारवाई सुरु असताना एकजण फरार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.
दिलीप मोहिते, वसंत सपकाळ, भिकाजी सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, अक्षय मोहिते अशी अटक केलेल्यांची नावे असून, या टोळीने यापूर्वीही खवल्या मांजरांची तस्करी केली आहे का, याचा शोध वन विभाग घेत आहे.
याबाबत वन विभागातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे व वन परिक्षेत्र अधिकारी भरारी पथकाचे सचिन डोंबाळे यांना शुक्रवार, दि. २९ रोजी माहिती मिळाली की, वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मीळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वाई ते सुरूर फाटा रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉलजवळ सापळा रचण्यात आला. वन विभागाचे पथक संशयित कधी येत आहेत, याची वाट पाहात होते. याचवेळी सहाजण दुचाकीवरुन बाजूला गेले आणि ज्याठिकाणी खवले मांजर लपवून ठेवले होते त्याठिकाणी गेले. तेथून त्यांनी खवले मांजर चारचाकी गाडीतून आणले. तेथे येताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलीप बाबुराव मोहिते (वय ५०, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (वय ५०, रा. धावडी, ता. वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३४, रा. भालेघर, ता. वाई), प्रशांत भीमराव शिंदे (वय ४४, शिरगाव, ता. वाई), अक्षय दिलीप मोहिते (वय २३, रा. पिपोंडे बुद्रुक, ता. कोरेगाव) या पाचजणांना तत्काळ ताब्यात घेतले. चारचाकीत ठेवलेल्या पोत्याची पाहणी केली असता, त्यामध्ये खवले मांजर असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ही कारवाई सुरु असतानाच यातील सहावा आरोपी तेथून पळून गेला.
वन विभागाने खवले मांजर, एक चारचाकी आणि एक दुचाकी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, ज्या पाचजणांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या टोळीतील फरारी झालेल्याने यापूर्वीही वन्यप्राणी तस्करीचे असे काही प्रकार केले आहेत का, याची माहिती घेण्यात येत असून, वन विभागाने त्या दिशेने तपास सुरु केला आहे. या कारवाईत वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वन परिक्षेत्र अधिकारी भरारी पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे, वाई येथील वन परिक्षेत्र अधिकारी महेश झांझुर्णे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, वनरक्षक विजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार, वाहनचालक दिनेश नेहरकर यांनी सहभाग घेतला.
चौकट:
दोषींना सात वर्षे शिक्षा...
खवले मांजर हे दुर्मीळ असून, ही सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. खवले मांजराला वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत वाघाएवढे संरक्षण दिले गेले आहे. या प्राण्याची तस्करी करताना दोषी आढळल्यास सात वर्ष सक्त कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी कायद्यात तरतूद आहे.
फोटो;