सातारा : बीस साल बाद... तोच उत्साह अन तीच तत्त्वनिष्ठा. १९९५ मध्ये साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळलेल्या मीरा बोरवणकर वीस वर्षांनी साताऱ्यात आल्या आणि शासकीय कामे आटोपल्यावर येथील मोना स्कूलमधील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. मुलांच्या पाच प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरं आणि नंतर सांगितलेली यशाची पंचसूत्री लहानग्यांना प्रेरक ठरली.राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) असलेल्या बोरवणकर यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा कारागृह आणि पोलीस कवायत मैदानाला भेट दिली आणि त्या मोना स्कूलमध्ये दाखल झाल्या. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक असताना त्यांची दोन मुले याच शाळेत शिकली. प्राचार्य एफ. एन. तगावी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात बोरवणकर यांचे स्वागत केले. शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना बोरवणकर म्हणाल्या, ‘एकाग्रता, शिस्त, कठोर मेहनत, कुतूहल आणि ‘नो शॉर्टकट’ हीच यशाची पंचसूत्री आहे. काम, खेळ, अभ्यास यापैकी जे करत असाल, त्यावर एकाग्र व्हा. ज्येष्ठांचे ऐकून शिस्त पाळा. यशासाठी मेहनत घेत असतानाच मनातील कुतूहल जागे ठेवा. आजूबाजूला काय चालले आहे, त्याकडे डोळसपणे पाहा. कोणत्याही परिस्थितीत ‘शॉर्टकट’ शोधू नका.’प्रारंभी कोणत्याही पाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारावेत, असे त्यांनी सांगितले. या प्रश्नांची उत्तरे देताना बोरवणकर म्हणाल्या, ‘आपल्याला नाउमेद करण्याची संधी कोणालाही देता कामा नये. तसे झाल्यास आपणच दोषी ठरतो. त्यामुळे दुसऱ्याला कधीही बळ न देता स्वत:ला बळकट करा. अपयश पचवूनच माझा यशापर्यंतचा प्रवास झाला आहे. महिलांनी पोलिसात भरती होऊ नये, असे मला सतत सांगितले जात होते. परंतु मला नाउमेद करण्याची परवानगी मी कुणालाच दिली नाही. उलट वाटचालीतील पुढील टप्पा गाठण्याची तयारी केली. त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. दृष्टिकोन सकारात्मक बनला.’ (प्रतिनिधी) थोरली बहीणच आदर्शकेंद्र शासनात मोठे अधिकारपद भूषवीत असलेली आपली थोरली बहीण अनिता कपूर हीच आपला आदर्श असल्याचे बोरवणकर यांनी सांगितले. ‘शालेय जीवनापासून घोडसवारी, नेमबाजीत मी भाग घेत असे. याखेरीज वक्तृत्व आणि नाटकांमध्येही सहभाग घेतला. मी अभ्यास गंभीरपणे केला आणि शिक्षकांच्या सूचना गांभीर्याने पाळल्या. त्यांनीच माझ्यातील क्षमता ओळखल्या. मग मी पोलिसिंगची सखोल माहिती घेऊन कामाचा श्रीगणेशा केला.’
पाच उत्तरं अन् यशाची पंचसूत्री...
By admin | Updated: August 11, 2015 22:13 IST