महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर प्रतापगडावर भवानीमातेचे मंदिर स्थापन केले. तेव्हापासून आजतागायत देवीच्या मूर्तीची पूजा शिवघराण्यांच्या पुरुष वंशजांनी न चुकता केली; मात्र इतिहासात प्रथमच भवानीमातेची पूजा करणारी शिववंशजातील पहिली कन्या म्हणून नयनताराराजेंनी मान पटकाविला. छत्रपती शिवाजी महाराजांची चौदावी पिढी म्हणजेच उदयनराजे भोसले यांची धाकटी कन्या नयनताराराजे यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिरात चांदीचे मेघडमरू देऊन देवीचं पूजन करण्यात आलं. उदयनराजेंची धाकटी कन्या नयनताराराजे भोसले आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या; मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आज सर्वांच्या समोर आल्या.विविध कारणांमुळे कायम चर्चेत असणारे आणि छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज छत्रपती उदनयराजे भोसले यांची धाकटी कन्या नयनताराराजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिरात चांदीचा तब्बल दीडशे किलोचा मेघडमरू देण्यात आला. यावेळी देवीची पूजाही त्यांच्याच हस्ते करण्यात आली. या मेघडमरूवरची कला-कुसर अप्रतिम असूनही कलाकारी पाहताक्षणी ती डोळ्यात भरते. हा मेघडमरू बनवण्यासाठी पुण्यातील दिग्गज कलाकारांना गडावर आणण्यात आले होते. ज्या डिझाईन आवडल्या नाहीत, त्या पुन्हा वितळवून बनवण्यात आल्या.छत्रपती उदयनराजे भोसले यांना आठ वर्षांचा वीरप्रतापसिंहराजे आणि पाच वर्षांची नयनताराराजे अशी दोन मुलं आहेत. ही मुलं बाहेरगावी असल्यामुळे ती कोणाच्याच समोर आली नव्हती. उदयनराजेंची कन्या नयनताराजे या प्रतापगडावर येणार असे कळल्यावर अनेकांनी गडावर गर्दी केली होती. पूजन झाल्यानंतर तलवारी, दांडपट्टा, मशालीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)तटबंदीवर उजळणार ३५५ मशालीप्रतापगडावर मंगळवार, दि. १३ रोजी भवानीमातेची घटस्थापना होणार असून, दि. १६ रोजी चतुर्थीला देवीचा जागर केला जाणार आहे. याच रात्री मशाल महोत्सवाचेही आयोजन केले गेले आहे. प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला यंदा ३५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शिवभक्त अप्पासाहेब उर्फ चंद्रकांत उत्तेकर यांच्यासह त्यांचे सहकारी मंदिरापासून ते शिवप्रताप बुरुजापर्यंत तटबंदीवर तब्बल ३५५ मशाली प्रज्वलित करणार आहेत. याचवेळी कुंभरोशीतील प्रतापगड वाड्यावरच्या स्वराज ढोल पथकातर्फे लयबद्ध तालावर शिवजागर केला जाणार आहे.
शिववंशज कन्येकडून प्रथमच भवानीमातेची पूजा
By admin | Updated: October 13, 2015 00:06 IST