सातारा : जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला कॉन्स्टेबल देवराम पारधी याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.दोन महिन्यांपूर्वी एका युवकाला जबरदस्तीने लुटल्याचा गुन्हा पारधीसह अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, संबंधित दुसऱ्या कर्मचाऱ्याने नाव या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याचे नाव काढून टाकले होते. मात्र, देवराम पारधीचा जबरी चोरीमध्ये समावेश असल्याचे समोर आले होते. घटना घडल्यापासून पारधी फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, तो पोलिसांना सापडला नाही. पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस आपल्या सहकार्याला पाठिशी घालत आहेत, असा आरोप झाला. सुरुवातीला दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु, पोलिसांनी तपास केल्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल होत नसल्याचे समोर आले. त्यानंतर केवळ कॉन्स्टेबल देवराम पारधी याच्यावरच जबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी कॉन्स्टेबल पारधी स्वत: हून न्यायालयात हजर झाला. न्यायालयातील पोलिसांनी देवराम पारधीला पाहिल्यानंतर त्याच्या अटकेची तयारी केली. त्यावेळी न्यायालयाने त्याची थेट कारागृहात रवानगी केली. शुक्रवारी तपासी अधिकाऱ्यांना यावर म्हणणे मांडण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तपासी अधिकाऱ्यांचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर पारधीला अटक होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार, हे समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फरारी कॉन्स्टेबलची कारागृहात रवानगी
By admin | Updated: October 16, 2014 22:49 IST