रामापूर : पाटण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मणदुरे भागात येथे झालेल्या जोरदार पावसाने भारसाखळे येथील डोंगराचा अर्धा भाग खचून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वस्तीपासून डोंगर लांब असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
पाटण तालुक्यातील मणदुरे भागातील भारसाखळे या ठिकाणी डोंगराचे भूस्खलन झाल्याने शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांत पाटण तालुक्यात झालेल्या पावसाच्या प्रकोपाने भारसाखळे येथील डोंगर खचून रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे पाणी साचून जमीन ठिसूळ झाल्याने जमिनीचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका मणदुरे परिसराला बसला. भारसाखळे येथील डोंगराचा अर्धा भाग खचला आहे. दरडी मोठ्या प्रमाणात कोसळल्याने अनेक झाडे उन्मळून लाखोंचे नुकसान झाले आहे. या खचलेल्या डोंगरातील दगड माती डोंगरालगत असलेल्या शेतजमिनीत आली आहे.
तीन ते चार दिवसांपासून येथील नागरिकांचा पाटणशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच दळणवळणाची पर्यायी व्यवस्था नसल्याने व एकमेव असलेला पूल वाहून गेल्याने रहदारीचा रस्ता नाहीसा झाल्याने. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लवकर यावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.