परळी : परळी खोऱ्यातील कुस बुद्रुक येथे दि. २६ रोजी लहान दोन मुलांनी गंमत म्हणून लावलेल्या आगीत सर्जा-राजाची जोडी होरपळली होती. दोन्हीही बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. यामधील एका बैलाचा रविवारी मृत्यू झाला असून, सर्जा-राजाची जोडी अखेर तुटली आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील कुस येथील लहू रामचंद्र लोटेकर यांच्या गोट्यानजीक दोन लहान मुलांनी गंमत म्हणून आग लावली होती. परिसरात वाळलेले गवत असल्याने व सोसाट्याचा वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बघता-बघता जनावरांच्या गोट्यालाही आग लागली. या आगीत सर्जा-राजाची जोडी होरपळून गंभीर जखमी झाली होती. गेले सात दिवस ही जोडी व्यवस्थित होण्यासाठी डॉक्टरांसह ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. मात्र, रविवारी यामधील एका बैलाचा मृत्यू झाल्याने या बैलांची जोडी तुटली. दरम्यान, या घटनेत सुमारे एक लाख तीस हजारांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)डॉक्टरांचेही वाचविण्यासाठी प्रयत्नही जोडी वाचविण्यासाठी डॉक्टर व ग्रामस्थ खूप प्रयत्न करीत होते. लोटेकर कुटुंबीयांचे नातेवाईकही ही जोडी व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यातील एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
...अखेर सर्जा-राजाची जोडी तुटली!
By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST