चाफळ : चाफळ विभागातील कोळेकरवाडी या डोंगरपठारावर दुर्गम भागात वसलेल्या गावाला पोहोच रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कोळेकरवाडीकरांची रस्त्याची गैरसोय दूर करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष पाठपुरावा करत गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी वन विभागाच्या मान्यतेसह आवश्यक असणाऱ्या ८८ लाखांच्या निधीची तरतूद करणार येणार आहे.
दरम्यान, बांधकाम विभागाचे ए. एम. जाधव, एस. आर. भोसले, वनपाल एस. बी. भट, वनरक्षक विलास वाघमारे व अधिकाऱ्यांनी शिंगणवाडी ते कोळेकरवाडी या दोन किलोमीटर ३५० मीटर रस्त्यापैकी वन हद्दीत येणाऱ्या १ किलोमीटर ६५० मीटर रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण केल्याने कोळेकरवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
चाफळ विभागातील कोळेकरवाडी व वनवासवाडी या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांना रस्त्याची सुविधा नाही. रस्त्याअभावी या गावात सुविधांची आजही वानवा आहे. याबाबतचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर मांडले होते. हा रस्ता वन विभागाचे हद्दीतून जात असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, शंभूराज देसाईंनी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन. एम. वेदपाठक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता एन. टी. भोसले, तत्कालीन वन अधिकारी विलास काळे व उपअभियंता आर. एस. भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक घेत या रस्त्याच्या कामाला वन विभागाची मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यासंदर्भात सूचित केले होते.
याबाबत वन विभागाची मान्यता घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्यासमवेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन याला तत्काळ मान्यता घ्यावी, अशाही सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.