सातारा : धोम धरणाच्या उजव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे भगदाड बुजविण्याच्या सूचना सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी दिली असल्याची माहिती दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे यांनी दिली.
बचाव समितीच्या वतीने सायगाव येथील कालव्याला पडलेल्या भगदाडाच्या प्रश्नाबाबत सिंचन विभागात चर्चा केली. शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता चालू रोटेशन बंद झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नाही; त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे; त्यास सर्वस्वी सातारा सिंचन विभाग जबाबदार राहील, असा इशारा दोन धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. त्यावर हे बघून अजून पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले.