साताऱ्यात धडकलं पत्र : शिवेंद्रसिंहराजेंच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धावपळ--आता मात्र ‘हद्द’ झाली...सातारा : सर्व बाबींची पूर्तता करूनही मंत्रालयात धूळ खात पडलेल्या हद्दवाढीच्या फायलीवरून शासनाने उलट सातारा नगर पालिकेलाच विचारणा केल्याची अजब घटना साताऱ्यात घडली आहे.विधानसभेच्या उन्हाळी अधिवेशनात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘हद्दवाढीचा विषय कशामुळे प्रलंबित आहे?’ असा तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची यंत्रणा हलली असून, मुंबईतून एक पत्र सातारा नगर पालिकेला प्राप्त झाले आहे. ‘सातारा हद्दवाढीचा विषय प्रलंबित राहण्यामागची कारणे काय, सातारा पालिकेने कोण-कोणती कागदपत्रे कधी-कधी सादर केली?’अशी माहिती या प्रत्राद्वारे महाराष्ट्र सरकारने मागविलेली आहे. तीन महिन्यांपूर्वीच सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही केवळ मंत्रालयातच हद्दवाढीची फाईल धूळ खात पडलेली असताना उलट आपल्यालाच या मागच्या कारणाची विचारणा होतेय, हे पाहून पालिकेच्या अधिकाऱ्याला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आपल्याकडून सर्व बाबी वेळेतच पूर्ण झाल्या आहेत. हे स्पष्ट करणारे उत्तर उलट टपाली देण्याची तयारी पालिकेच्या प्रशासन यंत्रणेने केली आहे. (प्रतिनिधी)
हद्दवाढीची फाईल मंत्रालयात; उलट विचारणा पालिकेलाच
By admin | Updated: June 14, 2016 23:57 IST