याबाबतचे निवेदन उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात सर्वांचे उद्योगधंदे, नोकऱ्या ठप्प झाल्या असताना वीज बिल कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट, अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारली गेली. सर्व ठप्प असताना अशा बिकट परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला हे बिल भरणे केवळ अशक्यच होते. हाच जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मनसेने हाती घेतला. मनसे नेते बाळा नांदगावकर व पक्षाचे शिष्टमंडळ यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटले. ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून वीज बिलांमध्ये सवलत देण्यासाठी अनुदानाची मागणी करणार असल्याचे वाढीव बिलामध्ये सूट दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी आता वीज बिल सर्वांना भरावेच लागेल, असे फर्मान काढल्याने मनसे आक्रमक झाली असून, ऊर्जामंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष रणजित कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अक्षय चव्हाण, मंदार ढवळीकर, आदी उपस्थित होते.