पाचगणी : येथील कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त समाजप्रबोधनासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर आज सकाळी तणावात झाले. संतप्त झालेल्या जमावाने गाडीची तोडफोड केल्याने पाचगणीत काही काळ तणाव निर्माण झाले होते.पाचगणी येथील कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एकांकी कार्यक्रमाच्या दरम्यान काही कारणाने अविनाश भोसले आणि महेश चौरसिया या दोंघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. पुढे कार्यक्रम सुरू असल्याने याबाबत कोणत्याही प्रकारचा तंटा होऊ नये, कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी शांततेची भूमिका घेण्यात आली.आज सकाळी घडलेल्या घटनेबद्दल अविनाश भोसले व त्याचे सहकारी राजेंद्र मारूती मोरे व पंढरीनाथविश्वनाथ सोनावणे यांनी आपल्या समाजातील प्रतिष्ठीत लोकांशी चर्चा केली व संबधिताविरुद्ध तक्रार करण्याचे ठरवले; पंरतु जमाव वाढत गेल्याने महेश चौरसिया यांच्याविरोधात क्षोभ उसळून आला. जमलेल्या जमावातील काही लोकांनी चौरसिया यांच्या शिवाजी चौकातील दुकानात जाऊन राडेबाजी करण्याचा प्रकार केला. यातील काही लोकांनी चौरसिया यांच्या गाडीची (एमएच ११ बीके ९११९) तोडफोड केली. या सर्व प्रकाराने काही काळ पाचगणीत काही काळ वातावरण तप्त झाले होते. तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि शांततेचे आवाहन करून शांतता प्रस्थापिथ केली. या घटनेवरून अविनाश भोसले यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.त्यांनतर कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जमा झाले होते. या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सर्वांनीच घ्यावी, असे ते म्हणाले. माजी नगरसेवक विठ्ठल बगाडे यांनीही संयमाचे आवाहन केले. ‘ज्याच्या हातून चूक झाली आहे त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. त्यामुळे सर्वांनी शांततेने निषेध व्यक्त करावा,’ असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक दिलीपभाऊ बगाडे, प्रकाश मोरे, राजू काकडे, अविनाश भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
शाब्दिक चकमकीने पाचगणीत तणाव
By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST